रायगड पोलिसांकडून ३२६ कोटींचे ड्रग्ज नष्ट

By Raigad Times    10-Jul-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | रायगड पोलिसांनी जप्त केलेले तब्बल ३७९.६९१ किलो अमली पदार्थ नष्ट केले. या अमली पदार्थांची एकूण किंमत ३२६ कोटी १० लाख ६ हजार ३२४ रुपये होती. जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल २७ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता. रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
 
रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या गांजा, चरस, कोकेन आणि केटामाईन या अमली पदार्थांचा समावेश होता. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व मुद्देमालाची मुंबई वेस्ट मॅनेजमेंट तळोजा, नवी मुंबई येथे पर्यावरणपूरक व कायदेशीर पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
 
अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधीक्षक (गुन्हे) निवृत्ती बोर्‍हाडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी या प्रक्रियेचे नियोजन व अंमलबजावणी केली. ३२६ कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याची ही कारवाई रायगड पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेतील महत्त्वपूर्ण आणि प्रभावी कामगिरी असल्याचे मानले जात आहे.