पनवेलच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय -मंत्री उदय सामंत

By Raigad Times    10-Jul-2026
Total Views |
panvel
 
मुंबई | पनवेल शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक असून, शिलार धरण प्रकल्पासह विविध पाणीपुरवठा योजनांना गती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य विक्रांत पाटील यांनी म.वि.प. नियम ९७ अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती.
 
मंत्री उदय सामंत म्हणाले, पनवेल महापालिकेला दररोज २६८ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सध्या २०४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ६४ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ४९३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, या योजनेतून ९० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या या योजनेतून ५७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे.
 
शिलार धरण प्रकल्पाद्वारे पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून, भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन शासन आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील पार्किंग समस्येवरही शासन लक्ष केंद्रित करत असून, मल्टी-लेव्हल पार्किंगची उभारणी करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. एकूण ४५४ आरक्षित भूखंडांपैकी ३४२ भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
 
पनवेलमधील सांस्कृतिक सुविधांच्या विकासालाही गती देण्यात येत आहे. सेक्टर-१० मधील सामाजिक सभागृहाचे काम सुरू असून सेक्टर-१३ मधील सामाजिक सभागृहाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच जुन्या पनवेलमध्ये नाट्यगृहासाठी इमारतीचा प्रस्ताव असून २७२ आसनक्षमतेचे मिनी ऑडिटोरियम आणि ५०० आसनक्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात येत आहे. या माध्यमातून पनवेलच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.