महाड | महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी गुरुवारी (९ जुलै) सलग दुसर्या दिवशीही कामबंद आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान भाजप नगरसेवक सूरज बामणे यांचे नगरसेवकपद तात्काळ रद्द करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. महाड नगरपरिषदेची कुर्ला धरणातून येणारी जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक सूरज बामणे यांनी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे जाब विचारण्यासाठी त्यांच्या दालनात प्रवेश केला.
यावेळी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, बामणे व त्यांच्या सहकार्यांनी मुख्याधिकार्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांमध्ये उमटले असून, बुधवारी सुरु करण्यात आलेले कामबंद आंदोलन गुरुवारीही कायम ठेवण्यात आले. कार्यालयाबाहेर एकत्र येत कर्मचार्यांनी "हिंसा नको, संवाद हवा”, "लोकशाहीत दादागिरी चालणार नाही”, "दोषींवर कठोर कारवाई करा”, "संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करा” अशा जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.
यावेळी आंदोलकांनी, "आज मुख्याधिकार्यांवर त्यांच्या कार्यालयातच हल्ला होत असेल, तर सामान्य अधिकारी व कर्मचार्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. दरम्यान, मुख्याधिकारी कोळेकर यांनीच मला मारहाण केलाचा दावा नगरसेवक सुरज बामणे यांनी केला असल्याची माहिती पुढे आली आहे.
आपण दुपारी जेवण्यासाठी घरी जायला निघालो असताना नगरसेवक सूरज बामणे अन्य दोन सहकार्यांना घेऊन मला भेटायला आले व त्यांनी वाहून गेलेल्या जलवाहिनीकरिता संबंधित लघु पाटबंधारे विभाग जबाबदार नसून तुम्ही जबाबदार असल्याचा आरोप करीत मारहाण केली. कोणत्याही समस्येची उकल ही चर्चेने होते, मारहाणीने होत नाही. याबाबत आपण महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. - धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी
अधिकार्याबाबत काही अडचण असेल, काम करत नसेल तर वरिष्ठांकडे अधिकृत तक्रार केली पाहीजे. मात्र अशाप्रकारे सरकारी अधिकारी, कर्मचार्यावर हात उचलणे योग्य नाही. कायदा हातात घेणे योग्य नाही. - भरत गोगावले, मंत्री