सापे-वामने रेल्वे स्थानकाचे भोग संपणार कधी ? सव्वा कोटींचा निधी मंजूर असूनही विकासकामांची प्रतीक्षा कायम; प्रवाशांमध्ये नाराजी

By Raigad Times    26-Jun-2026
Total Views |
mahad
महाड | कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुयातील सापे-वामने रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सुमारे १.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असतानाही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 
प्रशासनाने मार्च २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी स्थानकाची सद्यस्थिती पाहता हे काम वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. महाड तालुयातील वीर, सापे-वामने, करंजाडी आणि विन्हेरे ही कोकण रेल्वेवरील महत्त्वाची स्थानके आहेत.
 
त्यापैकी सापे-वामने स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. मात्र, वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या स्थानकावर मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. स्थानकावरील फलाटावर केवळ मर्यादित भागातच छप्पर उपलब्ध असून, उर्वरित भागात प्रवाशांना ऊन व पावसात उभे राहावे लागते. संपूर्ण फलाटावर संरक्षक छप्पर उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
 
याशिवाय स्थानक परिसरातील अपुरी प्रकाशव्यवस्था, वाढलेले गवत आणि साप-विंचवांचा वाढता वावर यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असली तरी इतर अनेक समस्या कायम आहेत. स्थानकाकडे जाणारा नवीन रस्ता नुकताच तयार करण्यात आला असला, तरी त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. पावसाळ्यात हा रस्ता खचण्याची अथवा चिखलमय होण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
तसेच स्थानकावरील फूड स्टॉल दीर्घकाळापासून बंद असल्याने प्रवाशांना खाण्यापिण्याची गैरसोय सहन करावी लागत आहे. हा स्टॉल पुन्हा सुरू करून स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही होत आहे. स्थानिकांच्या मते, सापे-वामने स्थानकाची भौगोलिक रचना आणि भविष्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता या स्थानकाला ‘जंशन’ म्हणून विकसित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मंजूर निधीचा तातडीने विनियोग करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, तसेच अतिरिक्त निधीसाठी लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
 
मागील सहा महिने मी स्थानकावरील कॅन्टीन चालवत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता स्थानकावरील प्रवासी संख्या वाढत असून, लवकरच पुन्हा सेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे. - अर्पिता बैकर, कॅन्टीन चालक