टोरंट प्रकल्पासाठी गाव सोडणार नाही , कर्जतमधील मल्टीवाडी ग्रामस्थांनी ठणकावले

By Raigad Times    26-Jun-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | कर्जत तालुयातील पाली तर्फे कोतवाल-खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापनाची भीती निर्माण झाली असून, मल्टीवाडीतील आदिवासी ग्रामस्थांनी टोरंट पॉवर प्रकल्पासाठी आम्ही आमचे गाव सोडणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
 
मल्टीवाडीत सध्या पाच कुटुंबे वास्तव्यास असून, अनेक पिढ्यांपासून ती साई डोंगर परिसरातील जंगलात वास्तव्यास आहेत. प्रस्तावित प्रकल्पासाठी धरण उभारण्यात येणार असल्याने या कुटुंबांना आपली घरे आणि जमीन सोडावी लागेल, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आम्ही गेली अनेक दशके या ठिकाणी राहत आहोत. आता धरण होणार म्हणून आम्ही आमची घरे-दारे सोडून कुठे जायचे ? असा सवाल ७० वर्षीय शिवाजी शंकर पवार यांनी उपस्थित केला.
 
टोरंट कंपनी आम्हाला बळजबरीने घराबाहेर काढू शकत नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी पाली ग्रामपंचायत हद्दीतील साई डोंगर परिसरात जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. या परिसरातील दळी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागेल, अशी चर्चा सुरू असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
 
मल्टीवाडीतील रहिवाशांचा उदरनिर्वाह जंगलातील रानमेवा, मासेमारी, खेकडे पकडणे आणि इतर नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहे. जंगलातील वन्यजीवांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. बिबट्या आणि इतर वन्य प्राणी आमच्या घराजवळ वावरतात. आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. ते आमचे शेजारीच आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या मते, योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची स्पष्ट व्यवस्था होईपर्यंत ते आपली जागा सोडणार नाहीत.
 
आमचे जीवन, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते या भूमीशी जोडलेले आहे. आम्ही येथेच जन्मलो, वाढलो आणि आयुष्य घालवले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही वाडी सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भविष्यातील उपजीविकेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.