कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना सरकारचा दिलासा ; ४२६ कोटी १५ दिवसांत येणार खात्यात!

रायगडातील सुमारे १७ हजार शेतकर्‍यांना २० कोटींची मदत

By Raigad Times    26-Jun-2026
Total Views |
 mumbai
 
मुंबई | कोकण विभागातील अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकर्‍यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत मदतीचा ४२६ कोटींचा निधी पुढील १५ दिवसांत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
 
सदस्य निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भरणे म्हणाले की, कोकणातील बागायतदार शेतकर्‍यांच्या नुकसानीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली असून बाधित शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
mumbai
 
एनडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी सुमारे २२ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात येणार असून कोकण विभागातील शेतकर्‍यांसाठी सुमारे २०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही मदत लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
जिल्हानिहाय मदतीचा तपशील देताना त्यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील ४ हजार ६६९ शेतकर्‍यांना ४ कोटी ८४ लाख रुपये, पालघर जिल्ह्यातील १७ हजार ७१२ शेतकर्‍यांना ६ कोटी ८३ लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील सुमारे १७ हजार शेतकर्‍यांना २० कोटी २८ लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ हजार ६२८ शेतकर्‍यांसाठी ९८ कोटी ४५ लाख रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ हजार ३२२ शेतकर्‍यांसाठी ७९ कोटी ५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे.
 
याशिवाय, हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत आंबा व काजू उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे २१७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. एनडीआरएफमधील मदत आणि पीक विमा योजनेंतर्गत मंजूर झालेली नुकसानभरपाई अशा दोन्ही रकमा पुढील १५ दिवसांत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. या विषयावरील चर्चेत सदस्य शेखर निकम यांनीही सहभाग घेतला.
 
अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकर्‍यांना पुढील पंधरा दिवसांत मदत वितरीत केली जाईल. - दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री