नवीन पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
पनवेल-नवी मुंबई परिसरात उभारण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाले असले तरी अद्याप त्याचे नामकरण झालेले नाही. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि विविध सामाजिक संघटनांची अनेक वर्षांपासून मागणी आहे.
या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे आणि विविध लोकशाही मार्गाने प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र अद्याप नामकरणाचा प्रश्न प्रलंबितच आहे. दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त २४ जून रोजी राजेंद्र पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर नामकरणाचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.