पनवेल | पनवेल शहरातील रोहिदास वाडा परिसरातील आदित्य महादेव, मारुती आर्केड, जय श्रीराम, सनशाईन वसुंधरा तसेच अन्य अनेक इमारतींमध्ये वीज केबलमध्ये बिघाड झाल्याने बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता.
परिणामी परिसरातील पाण्याचे पंप आणि लिफ्ट सेवा बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. या समस्येबाबत परिसरातील रहिवाशांनी नगरसेवक राजू सोनी, प्रभाग अध्यक्ष पवन सोनी तसेच त्यांचे सहकारी मंदार देसाई यांच्याकडे तक्रार केली.
माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि महावितरणचे मुख्य अभियंता सातपुते यांच्याशी संपर्क साधून आवश्यक पाठपुरावा केला. यानंतर महावितरणच्या कर्मचार्यांनी एमएसईबी कार्यालयाजवळील दत्त मंदिर डीपी ते पोटे मसाले डीपीदरम्यानची खराब झालेली थ्री-फेज वीज केबल बदलून दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला असून पाणीपुरवठा व लिफ्ट सेवा देखील सुरळीत करण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर परिसरातील रहिवासी तसेच विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी नगरसेवक राजू सोनी, पवन सोनी, मंदार देसाई तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले. परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यात अशा प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.