कोर्लई | मुरुड-सुपेगाव-रोहा मार्गावरील सुपेगाव परिसरात रस्त्यालगतची झाडे आणि झुकलेल्या फांद्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावर खाली आलेल्या फांद्या तसेच वाढलेल्या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने रस्त्यांच्या दुतर्फा गवत, झाडी आणि झुडपे वेगाने वाढतात. त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमितपणे झाडांची छाटणी करून झुडपे हटविण्याची कामे करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
फणसाड अभयारण्य, काशीद बीच आणि मुरुड-जंजिरा किल्ला या प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी रोहा-सुपेगाव-मुरुड हा मार्ग तुलनेने जवळचा असल्याने शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर तसेच इतर जिल्ह्यांमधून येणारे पर्यटक या मार्गाचा वापर करतात. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या मार्गावर झाडाझुडपांचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या असून काही फांद्या अवजड वाहनांना लागून तुटलेल्या अवस्थेत लोंबकळत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने झाडांच्या फांद्या आणि झुडपे हटवावीत अशी मागणी करण्यात येत आहे.