अलिबाग-फुफादेवी पाडा येथे दरड कोसळली ! घराच्या आवारात महाकाय दगड; सुदैवाने सर्व सुखरुप

By Raigad Times    26-Jun-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील फुफादेवी पाडा परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. या दरडीसह आलेला भला मोठा दगड थेट एका घराच्या कंपाऊंडमध्ये येऊन पडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
 
चंद्रकांत पाटील हे फुफादेवी येथे राहतात. गुरुवारी (२५ जून) सकाळी उठल्यानंतर त्यांना दरड कोसळल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सदर कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
 
यादरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या मुलाने ही बाब ग्रामपंचायतीला कळवल्यानंतर उपसरपंच संजय पाटील, ग्रामसेविका निशा चंदनकर, मंडल अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली. संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने, शाळेत स्थलांतर करण्याची विनंती मात्र पाऊस थांबलेला असल्याने त्यांनी स्थलांतरासाठी नकार दिली.
 
तसेच काही वाटले तर मुलीच्या घरी जावू, असे सांगितले. यावेळी सुशिल पाटील, तुषार पाटील, रमाकांत पाटील, अनंत पाटील तसेच सविता पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, दगड घरामागील संरक्षक पिचिंगला धडक देत कंपाऊंडमध्ये घुसला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, आणखी दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.