महाड | जून महिना संपत आला तरी महाड तालुयात मान्सूनने अद्याप सातत्यपूर्ण हजेरी लावलेली नाही. संपूर्ण जून महिनाभर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासन चिंतेत होते. अखेर २१ जून रोजी पावसाचे आगमन झाल्यानंतर तालुयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सुरुवातीला दोन दिवस सायंकाळी हजेरी लावणार्या पावसाने २३ जून रोजी अचानक रौद्ररूप धारण करत दिवसभर आणि रात्रभर मुसळधार बरसून तालुयाला अक्षरशः झोडपून काढले. या दमदार पावसामुळे अवघ्या २४ तासांत तब्बल ९८ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. उन्हाच्या झळांनी कोरड्या पडलेल्या शेतजमिनी ओलावल्या गेल्या.
खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला ओलावा निर्माण झाल्याने शेतकर्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात करण्याची तयारी केली. काही भागांत भातशेतीच्या पूर्वमशागतीच्या कामांनाही वेग आला. पावसामुळे तालुयातील लहान-मोठे जलसाठे, विहिरी तसेच ओढे-नाले पुन्हा जिवंत झाले. धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाणार्या नागरिकांना आणि प्रशासनाला यामुळे मोठा दिलासा मिळाला.
अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. त्यामुळे या पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काही प्रमाणात सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. विशेष म्हणजे, २३ जूनच्या मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला असून वातावरणात उकाडा वाढला आहे.
आकाशात ढगांची उपस्थिती असली तरी पावसाच्या सरी कोसळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढलेल्या आर्द्रतेमुळे उष्मा अधिक जाणवत असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे. पावसाच्या या लहरी स्वभावामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला आहे.