मुंबई | राज्यात बालविवाह रोखण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही व प्रभावी उपाय योजना राबविण्यात येत असून पुढील पाच वर्षांत बालविवाहाचे प्रमाण १० टक्याच्या आत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी याविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य नाना पटोले यांनी सहभाग घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्याच्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार २०१९ ते २०२१ या कालावधीत देशातील बालविवाहाचे प्रमाण २३.३ टक्के होते, तर महाराष्ट्रात ते २१.९ टक्के होते.
२०२३-२४ मधील निवडक जिल्ह्यांच्या सर्वेक्षणात देशाची सरासरी २०.१ टक्क्यांवर आली आहे. महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण घटून १९.७ टक्क्यांवर आले आहे. चालू वर्षात आतापर्यंत १ हजार ४३४ बालविवाह रोखण्यात आले असून याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.