अलिबाग | कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे चांगलेच सक्रिय झाल्याने रायगड जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अलिबाग तालुक्यातील देहेन गावाजवळ असलेल्या बंधार्याला मोठे भगदाड पडून तो वाहून गेला आहे.
परिणामी देहेन गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बंधारा फुटल्यामुळे गावातील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच उपचार, शासकीय कामे आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर जाणार्या नागरिकांनाही अड चणींचा सामना करावा लागत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. बंधार्याची त्वरित दुरुस्ती करून गावासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी तसेच आवश्यक मदत आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.