पनवले-वलप ग्रामपंचायतीमध्ये २ हजार ६६० बनावट जन्म नोंदी ; पनवेल पोलिसात गुन्हा दाखल; तीनजण अटकेत

आ.प्रशांत ठाकूर,आ.महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न

By Raigad Times    25-Jun-2026
Total Views |
mumbai
 
मुंबई | पनवेल तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीच्या नागरी नोंदणी प्रणालीचा (सीआरएस) गैरवापर करून तब्बल २ हजार ६६० बनावट जन्मनोंदी तयार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली.
 
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, वलप (ता.पनवेल, जि. रायगड) ग्रामपंचायतीच्या नागरी नोंदणी प्रणाली मधील ‘अ‍ॅड ओल्ड इव्हेंट’ या पर्यायाचा वापर करून डिजिटाइज्ड करण्यात आलेल्या जुन्या जन्मनोंदींची पडताळणी करताना फेब्रुवारी २०२६ मध्ये २ हजार ६६० जन्मनोंदी बनावट असल्याचे आढळून आले.
 
या बनावट नोंदी रद्द करण्यासाठी कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासंदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, de.crsorgi.gov. या ऑनलाईन प्रणालीचा वापर करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत आणि एसओपीनुसार प्रणाली हाताळण्याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयामार्फत जन्म-मृत्यू निबंधकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्याचेही ग्रामविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले.