उरण येथील कंटेनर टर्मिनलला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित

जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

By Raigad Times    24-Jun-2026
Total Views |
mumbai
 
मुंबई | उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार आहे; तसेच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
 
उरण येथील भारत मुंबई कंटेनर टर्मिनलला जोडणार्‍या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत विधानपरिषद सदस्य अभिजात वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला. मंत्री भोसले म्हणाले की, संबंधित पुलामध्ये कोणतीही संरचनात्मक त्रुटी आढळलेली नाही. पुलालगतच्या भरावाचा काही भाग खालच्या मातीच्या थरात झालेल्या नैसर्गिक स्थिरीकरणामुळे (सेटलिंग); काही प्रमाणात अतिवजनाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे खचला असण्याची शक्यता आहे.
 
मात्र, पुलाच्या सुरक्षिततेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो संबंधित ठेकेदाराकडून देखभाल करारातील (मेंटेनन्स क्लॉज) तरतुदीनुसार करण्यात येत आहे. भरावाची दुरुस्ती; तसेच आवश्यक काँक्रीटीकरणाचे काम जुलै २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामासाठी कोणताही अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला नसून संबंधित एजन्सीवरच दहा वर्षांच्या देखभालीची जबाबदारी असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.