मुंबई | अंमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली असून प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
राज्यभर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविताना विविध विभागांच्या समन्वयातून ‘होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच’ कार्यान्वित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अंमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि सेवन हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशासमोरील गंभीर आव्हान आहे. त्यामुळे गृह विभागाच्या माध्यमातून विविध यंत्रणांचा समन्वय साधून अवैध शेती, उत्पादन, वाहतूक, व्यापार, विक्री आणि सेवन यांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी १,१४२ गुन्हे दाखल करण्यात आले असून १,६२६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ सेवनाविरोधात ३,१९९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मे २०२६ अखेर विक्री करणार्यांविरोधात ५२८ गुन्हे दाखल करून ६५५ आरोपींना अटक करण्यात आली, तर सेवन करणार्या २ हजार ८५५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांत यशस्वी कारवाया केल्या असून २०२५ मध्ये तब्बल ५२३.१७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. कारवाईदरम्यान जप्त केलेला माल पूर्णपणे जाळून नष्ट केला जात असल्याने तो पुन्हा बाजारात येण्याची शक्यता नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.