मुंबई | जंगलात लागणारे वणवे आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध देशांतील कार्यपद्धतीचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील वनविभागाच्या चार अधिकार्यांचे पथक पाठवण्याचा मानस असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य भास्कर जाधव यांनी याविषयी मांडलेल्या लक्षवेधी चर्चेत सदस्य शेखर निकम, दिलीप लांडे, सुनील प्रभू यांनी सहभाग घेतला, त्यास उत्तर देताना मंत्री नाईक बोलत होते. वनमंत्री नाईक म्हणाले की, राज्यातील जंगलांमध्ये वणवा लागू नये यासाठी; तसेच राज्यातील वनसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी वनविभाग सातत्याने कार्यरत आहे.
वन विभागाच्या या कामात जनसामान्यांचा सहभाग महत्वाचा असून यासाठीच्या जनजागृतीमध्ये सर्वच पदाधिकार्यांनी सहभाग घ्यावा. वनमंत्री नाईक म्हणाले की, राज्यातील खासगी मालकी असणार्या जागेत लागणारा वणवा, यामुळे होणारे नुकसान, त्याबाबतची भरपाई या संदर्भात संबंधित विभाग व मंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाईल.