मुंबई | राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल अथवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
सदस्य शंकर जगताप यांनी विधानसभेत याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि सिद्धार्थ शितोळे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यात मालवाहतूक करणार्या खासगी प्रवासी बसेस संवर्गातील सर्व वाहनांची वायू वेग पथकामार्फत नियमित तपासणी करुन दोषींवर कारवाई केली जाते.
मात्र, यापुढे वारंवार नियमांचे उल्लंघन करणार्या दोषी वाहन चालक आणि मालकांवर थेट मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ८६ नुसार कारवाई करण्यात येणार येणार आहे. यापुढे पहिल्या उल्लंघनासाठी ७ ते १० दिवस, दुसर्या उल्लंघनासाठी १० ते १५ दिवस, तिसर्यांदा उल्लंघन केल्यास १५ ते ३० दिवस आणि चौथ्यांदा उल्लंघन केल्यास परवाना थेट रद्द केला जाईल.
मंत्री सरनाईक म्हणाले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कडक कारवाई केली जात असून वायू वेग पथकामार्फत २०२५- २०२६ मध्ये मालवाहतूक करणार्या खाजगी प्रवासी बसेस संवर्गातील ५,७२८ दोषी वाहनांवर कारवाई केली आहे. ४६१.७८ लाख इतका दंड वसूल केला आहे. तसेच १ एप्रिल ते ३१ मे २०२६ पर्यंत १४५४ दोषी वाहनांवर कारवाई केली असून ७८.१८ लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे.