श्रीवर्धनचे नगराध्यक्ष अ‍ॅड.अतुल चौगुले आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

By Raigad Times    23-Jun-2026
Total Views |
 shreewardhan
श्रीवर्धन । श्रीवर्धन नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष अ‍ॅड.अतुल अरविंद चौगुले हे ठाकरे गटाला ‘राम राम’ करुन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज, 23 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
 
श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीला धोबीपछाड देत, शिवसेना ठाकरे गटाकडून अ‍ॅड.अतुल चौगुले हे नगराध्यक्षपदाची निवडणूक विजयी झाले होते. या निवडणुकीत ठाकरे गटाकडून त्यांच्या प्रचारासाठी कोणीही मोठा नेता फिरकला नव्हता; मात्र शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी त्यांना मदत केली होती.
 
नगराध्यक्षपदाची निवडणूक विजयी झाल्यानंतर अ‍ॅड.अतुल चौगुले शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु झाला होती. मात्र त्यावेळी चौगुले यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केले होते. सोमवारी ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. चौगुले यांनीही शेवटी शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आज (23 जून) रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांचा प्रवेश होणार आहे. यावेळी मंत्री भरत गोगावले, आ.महेंद्र दळवी, लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अ‍ॅड.अतुल चौगुले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला दक्षिण रायगडमध्ये धक्का बसला आहे.