रोहा । रोहा-अष्टमी नगरपालिकेने केलेल्या पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत सोमवारी (22 जून) नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले. सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकण्यात आल्याचा आरोप करत वाढीव दर तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, प्रशासन आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चर्चे नंतरही तोडगा न निघाल्याने शहरप्रमुख राजेश काफरे यांच्यासह शिवसैनिक उपोषणावर ठाम राहिले आहेत. महागाईमुळे नागरिक आधीच आर्थिक अडचणीत असताना पाणीपट्टीत करण्यात आलेली वाढ असह्य असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. रोहा-अष्टमी नगरपालिकेने वार्षिक पाणीपट्टी 2 हजार 800 रुपये निश्चित केली असून, इतर नगरपालिकांच्या तुलनेत हा दर अधिक असल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला.
महाडमध्ये 1 हजार 100 रुपये, श्रीवर्धनमध्ये 1 हजार 200, मुरुड व कर्जतमध्ये 1 हजार 500, अलिबागमध्ये 860, खोपोलीत 1 हजार 300, उरणमध्ये 2 हजार आणि पेणमध्ये 1 हजार 200 रुपये पाणीपट्टी असताना केवळ रोहेकरांवरच अधिकचा भार का? असा सवाल करण्यात आला. रोहा शहरप्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत कडू, प्रितम देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नगरपालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. “पाणीदरवाढ कमी करा”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दरम्यान, पाणीपुरवठा सभापती महेंद्र दिवेकर यांनी आंदोलकांना प्रशासनाची बाजू ऐकून घेण्याची विनंती केल्यानंतर कै.द.ग. तटकरे सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी पाणीपुरवठा योजनेचा जमा-खर्च अहवाल सादर केला. वीजबिलातील वाढ, कर्मचार्यांचे वेतन, देखभालदुरुस्ती खर्च आणि पाणीपुरवठा विभागातील आर्थिक तूट लक्षात घेऊन दरवाढ अपरिहार्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शासनाने सुचविलेल्या 3 हजार 600 रुपयांच्या तुलनेत कमी दर निश्चित केल्याचा दावादेखील करण्यात आला. बैठकीला उपाध्यक्ष अहमद दर्जी, सभापती महेंद्र दिवेकर, रविंद्र चाळके, महेश कोलटकर, नीता हजारे, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू, अरबाज मनेर तसेच राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांना पाठिंबा
या आमरण उपोषणसमयी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रशांत देशमुख यांसह सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, मिलिंद अष्टीवकर, उस्मानभाई रोहेकर, अमोल देशमुख, शिंदे शिवसेनेचे प्रकाश कोळी, रोशन पवार, आशिष स्वामी यांच्यासह अनेकांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.