अलिबाग | जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील घट लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव (स्विमिंग पूल) २० जून ते ३० जून या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे अद्याप मान्सून जिल्ह्यात पूर्णपणे दाखल झालेला नसून उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील २८ लघुप्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १७.८९ टक्के तर हेटवणे मध्यम प्रकल्पामध्ये २७.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच महावेध पोर्टलवरील अहवालानुसार दि. २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ८.९ मि.मी. म्हणजेच सुमारे २ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी स्विमिंग पूल बंद ठेवणे, पाणी पुरवठ्यात आवश्यक ती कपात करणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि अनधिकृत पाणीवापर थांबविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्यांनी आदेशात नमूद केले आहे.