नवी मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून नवा टप्पा गाठला जाणार असून, येत्या १५ जुलै रोजी पहाटे अबुधाबीकडे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण रवाना होणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या नॉनस्टॉप सेवेद्वारे प्रत्यक्ष शुभारंभ होणार असून, या उड्डाणासाठी तिकीट विक्रीलाही प्रारंभ झाला आहे.
त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विमान वाहतुकीला नवे दालन उपलब्ध होणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन २५ डिसेंबरपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार असल्याचे निश्चित झाले होते, त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा प्रारंभ होत असल्याने नवी मुंबई विमानतळाची कार्यक्षमता आणि महत्त्व अधोरेखित झाले आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात एअर इंडिया एक्स्प्रेसकडून आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवस अबुधाबीसाठी सेवा उपलब्ध राहणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन भविष्यात उड्डाणांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण, स्लॉटची मर्यादा आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता नवी मुंबई विमानतळ हा पर्यायी नव्हे, तर पूरक केंद्र म्हणून विकसित केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय सेवांच्या प्रारंभामुळे विशेषतः नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्यपूर्वेतील प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या अबुधाबीशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित झाल्याने व्यावसायिक, पर्यटन तसेच रोजगाराच्या दृष्टीनेही नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पुढील काळात आखाती देशांसह आशिया आणि युरोपमधील विविध शहरांसाठीही नवी मुंबई विमानतळावरुन थेट उड्डाणे सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, त्यावरील पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण ही केवळ विमानसेवेची सुरुवात नसून, मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक आणि वाहतूक विकासातील एका नव्या पर्वाची नांदी मानली जात आहे.
ठळक मुद्दे
*नवी मुंबई विमानतळावरुन १५ जुलैला पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण
*अबुधाबीसाठी एअर इंडिया एक्सप्रेसची नॉनस्टॉप सेवा
*आठवड्यातून तीन दिवस उड्डाण सेवा उपलब्ध
*तिकीट बुकिंगला सुरुवात; मागणीनुसार सेवेत वाढ होणार
*मुंबई विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यास मदत
*नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरातील प्रवाशांना मोठा लाभ
*व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार