श्रीवर्धन | सातबारा उतार्यातील दुरुस्तीच्या कामासाठी ६० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीवर्धन प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
म्हसळा तालुक्यातील पाभरे येथील एका शेतकर्याला सातबारा उतार्यातील दुरुस्तीसाठी मागील अनेक दिवसांपासून प्रांत कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागत होत्या. मात्र काम होत नसल्याने संबंधित कर्मचार्याने हे काम करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अलिबागच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. लाचेचा पहिला ३० हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना अव्वल कारकून नितीन पवार व शिपाई सचिन पाटील यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यापूर्वीही श्रीवर्धन तहसील कार्यालयातील एका कर्मचार्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.