रायगड किल्ला संवर्धनाच्या कामाचा वेग वाढवा; आशिष शेलार

By Raigad Times    19-Jun-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | रायगड किल्ल्याच्या संवर्धन व सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवून संवर्धनाच्या कामांना गती देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले.
 
रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
बैठकीत रायगड किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, दिशादर्शक फलक (सायनेजेस), पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवाला साजेशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वयातून कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देशही मंत्री शेलार यांनी दिले.