पनवेल विरोधी पक्षनेतेपदाची ‘संगीत खुर्ची’, अरविंद म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर, पुन्हा त्यांच्याच नावाची शिफारस

By Raigad Times    18-Jun-2026
Total Views |
panvel
 
 पनवेल | पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करुन अखेरच्या क्षणी माघार घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणारे अरविंद म्हात्रे यांच्याच नावाची पुन्हा एकदा शिफारस करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
 
विशेष म्हणजे, त्यांचा राजीनामा अद्याप अधिकृतरित्या स्वीकारला गेला नसताना त्यांनाच पुन्हा विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे करण्यात आल्याने या पदाभोवतीचे राजकारण अधिकच गडद झाले आहे. पनवेल महापालिकेत विरोधी पक्षाचे एकूण १८ नगरसेवक आहेत. त्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पाच नगरसेवक स्वतंत्र गट म्हणून कार्यरत असून शेतकरी कामगार पक्ष-काँग्रेस आघाडीचे १३ नगरसेवक आहेत.
 
या संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपदावर शेकाप-काँग्रेस आघाडीचा दावा मजबूत ठरला आणि त्यातून अरविंद म्हात्रे यांची नियुक्ती झाली. मात्र ही नियुक्ती सहजासहजी झालेली नव्हती. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याचा आरोप करत म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विरोधी पक्षाला त्याचा घटनात्मक अधिकार मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
 
न्यायालयीन हस्तक्षेपाची वेळ येण्यापूर्वीच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पनवेलच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाने अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक शेवटपर्यंत लढविणार असल्याची भूमिका त्यांनी वारंवार मांडली होती.
 
मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली, तर मित्रपक्षांतील काही नेत्यांनीही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली. सोशल मीडियावरही त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाढत्या टीका आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर अरविंद म्हात्रे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौरांकडे सादर केला.
 
वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या टीका आणि आरोपांमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे विरोधी पक्षात नव्या नेतृत्वाच्या शोधाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु त्यानंतर घडलेल्या राजकीय हालचालींनी चित्र बदलले. शेकाप-काँग्रेस आघाडीचे गटनेते केतन भगत यांनी पुन्हा एकदा अरविंद म्हात्रे यांच्या नावाचीच शिफारस महापौरांकडे केली. या निर्णयातून विरोधी पक्षाच्या गोटात म्हात्रे यांच्यावरील विश्वास कायम असल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.
 
आता या संपूर्ण प्रकरणात निर्णायक भूमिका महापौर नितीन पाटील यांची ठरणार आहे. पिठासन अधिकारी म्हणून त्यांना प्रथम राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. राजीनामा स्वीकारायचा की नामंजूर करायचा, यावर पुढील प्रक्रिया अवलंबून आहे. राजीनामा, विधान परिषद निवडणूक, उमेदवारी माघार, पुनर्शिफारस, न्यायालयीन इशारे आणि प्रलंबित निर्णय या सर्व घडामोडींमुळे पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद सतत चर्चेत राहिले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय नाट्यात केंद्रस्थानी एकच नाव कायम राहिले आहे अरविंद म्हात्रे. यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची ही लढाई आता केवळ एका पदाची नसून नेतृत्व, राजकीय प्रतिष्ठा आणि विरोधी पक्षातील शक्तिसंतुलनाची कसोटी ठरत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.