उन्हाळी सुट्टीनंतर रायगडात शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट , शाळेचा पहिला दिवस मुख्यमंत्र्यांनी केला खास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पीएमश्री वहाळ शाळेला भेट

By Raigad Times    16-Jun-2026
Total Views |
 alibag
अलिबाग | उन्हाळी सुट्टीचा आनंद अनुभवून तब्बल दीड महिन्यानंतर सोमवारी (१५ जून) रायगड जिल्ह्यातील शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खुले झाले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शाळांमध्ये उत्साह, आनंद, कुतूहल आणि भावनांचा अनोखा संगम पहायला मिळाला.
 
रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा हा पहिला दिवस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास केला आहे. त्यांनी ‘पीएमश्री शाळा’ वहाळे शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. यंदा प्रथमच शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार्‍या चिमुकल्यांसाठी हा दिवस विशेष ठरला. अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सवानिमित्त फुलांची उधळण, औंक्षण, स्वागतगीत आणि टाळ्यांच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
 
alibag
 
नवीन पुस्तके, कोर्‍या वह्या, चमकदार दप्तर, नवीन गणवेश आणि नव्या वर्गाची उत्सुकता घेऊन विद्यार्थी शाळेत दाखल झाले. अनेक दिवसांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा, सुट्टीतील आठवणींची देवाणघेवाण आणि नव्या वर्षाबद्दलच्या अपेक्षांनी शाळांचा परिसर गजबजून गेला होता. पहिल्यांदाच आपल्या लेकराला शाळेत सोडणार्‍या पालकांसाठीही हा क्षण तितकाच भावनिक होता. आई-वडिलांचा हात सोडून वर्गात जाण्याची वेळ येताच काही बालकांनी रडण्यास सुरुवात केली.
 
वर्गाच्या खिडकीतून हात हलवत ‘बाय’ करणारी मुले आणि त्यांना धीर देणारे पालक हे दृश्य डोळ्यांत नकळत पाणी आणणारे ठरले. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात होत असल्याचा आनंद आणि त्याचवेळी एका नव्या वातावरणात, आपल्यापासून काही काळ दूर राहण्याची हुरहूर दिसत होती. शिक्षण हा केवळ अभ्यासाचा विषय नसून संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे. त्यामुळे ‘शाळेचा पहिला दिवस’ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक संस्मरणीय टप्पा ठरतो. रायगडातही हा प्रवेशोत्सव उत्साह, आपुलकी आणि भावनिक वातावरणात साजरा होत नव्या शैक्षणिक वर्षाची मंगलमय सुरुवात झाली.

alibag 
शासकीय अधिकार्‍यांनी वाढवला विद्यार्थ्यांचा उत्साह
प्रवेशोत्सवाचे हे चैतन्य केवळ वहाळ शाळेपुरते मर्यादित नव्हते, तर जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उलवे येथील शाळेला भेट दिली.
 
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील राजिप शाळेला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रूपाली सातपुते यांनी पळस्पे शाळेला, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी पोलादपूर चांभारगणी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित केले.
मान्यवरांची उपस्थिती....
वहाळ शाळेत आयोजित या विशेष कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य महेश बालदी, विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, दुग्ध व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, राजिप सदस्य कमला देशेकर, अनन्या गाताडे, प्राची जाधव, हर्षदा घरत, निकिता खारकर, ललिता दहितुले, महारूद्र नाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

alibag
 
आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन
रायगड जिल्हा परिषदेच्या पीएमश्री शाळा वहाळ शाळेतील बहुप्रतिक्षीत अशा अत्याधुनिक आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी या अत्याधुनिक प्रयोगशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तिची डिजिटल कार्यपद्धती सविस्तरपणे जाणून घेतली. या डिजिटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता दृकश्राव्य (ऑडिओव्हिज्युअल) पद्धतीने आधुनिक शिक्षण मिळणार असून, यामुळे कठीण मानले जाणारे विषयही अत्यंत सोपे, रंजक आणि मनोरंजक होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

alibag
 
विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत
पनवेल | येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदलांबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासपूर्ण प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
 
डिजिटल युगातील शिक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटल शिक्षण हे काळाची गरज असून भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची आणि मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनीने घेतलेली ही मुलाखत आणि त्यातून मिळालेला प्रेरणादायी संदेश हा शाळा प्रवेशोत्सवाचा विशेष आकर्षण ठरला.