अलिबाग-सारळ येथे पोलिसांचा छापा , गांजा सेवनप्रकरणी दोघांवर एनडीपीएस कारवाई

विदेशी महिलेविरुद्धही गुन्हा

By Raigad Times    16-Jun-2026
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका उच्चभ्रू सोसायटीवर रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मांडवा सागरी पोलिसांच्या मदतीने धाड टाकत गांजा सेवन करणार्‍या दोघांविरुद्ध कारवाई केली आहे.
 
याच कारवाईदरम्यान व्हिसाची मुदत संपूनही भारतात वास्तव्यास असलेल्या एका विदेशी महिलेचा शोध लागल्याने तिच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. १४ जून रोजी पहाटे सारळ येथील ‘इनर सर्कल’ सोसायटीमध्ये संयुक्त छापेमारी करण्यात आली.
 
कारवाईदरम्यान काही व्यक्ती पार्टी करत असल्याचे आढळून आले. त्यापैकी दोन जण कागदी नळीत भरलेला अमली पदार्थ ओढताना पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीत संबंधितांनी गांजाचे सेवन केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गांजाने भरलेल्या कागदी नळ्या, अर्धवट जळालेली गांजाची नळी तसेच अमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा ग्राइंडर जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे वजन सुमारे तीन ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
याप्रकरणी दोघांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, छापेमारीवेळी उपस्थित असलेल्या एका विदेशी महिलेच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता तिच्या व्हिसाची मुदत संपल्याचे उघड झाले. त्यानुसार तिच्याविरुद्ध ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अ‍ॅक्ट, २०२५’ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे यांच्या पथकाने केली.