अलिबाग | जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी रायगडसह कोकणात मान्सूनचा पत्ता नाही. पाऊस लांबल्यामुळे पेरण्यादेखील रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावणारा पाऊस यंदा अद्यापही गायब आहे.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेही संकट डोक्यावर आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील वातावरणीय स्थिती, मान्सूनच्या प्रवाहातील मंदावलेली गती, तसेच काही भागांतील कमी दाबाच्या पट्ट्यांची अनुपस्थिती यामुळे पावसाचे आगमन आणि प्रगती अपेक्षेपेक्षा संथ झाली आहे. जागतिक हवामान बदल, वाढते तापमान आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील चढ-उतार यांचाही मान्सूनच्या पॅटर्नवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पावसाचा जास्त लांबणीवर गेल्यास ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोतांवरील ताण वाढणार आहे. रायगडमधील अनेक गावांमध्ये सध्या उपलब्ध जलसाठा मर्यादित असून, पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ग्रामपंचायतींनी संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचे नियोजन सुरु आहे.
खरीप हंगामातील उशिरा होणारी पेरणी ही केवळ उत्पादनावरच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम करणारी ठरु शकते. भात, नाचणी, वरी, भाजीपाला आदी पिकांच्या उत्पादनात घट झाल्यास शेतकर्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. तसेच मजुरांना मिळणार्या रोजगाराच्या संधीही कमी होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचे मत
कृषी आणि हवामान तज्ज्ञांच्या मते, पाऊस उशिरा सुरू झाला तरी पुढील काळात तो नियमित आणि पुरेशा प्रमाणात झाल्यास नुकसान काही प्रमाणात भरुन निघू शकते. मात्र दीर्घकाळ पावसाचा खंड राहिल्यास खरीप हंगाम संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.