पेण | मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरात अवैध पद्धतीने ओव्हरलोडेड गौण खनिज वाहून नेणार्या भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (३० मे) रात्री घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सुमारे दीड तास महामार्गावर आंदोलन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास पेण-पनवेल मार्गावरील खारपाडा गावातील पोलीस चौकीसमोर हा भीषण अपघात घडला. डंपर चालकाने मद्यप्राशन करून वाहन अतिवेगाने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालविल्याने त्यावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आदित्य किशोर बल्लाळ वाडकर (वय २२) व यश मुकेश बल्लाळ (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत दोघेही मूळचे चिपळूण तालुक्यातील असून सध्या मुंबईतील विक्रोळी येथे वास्तव्यास होते. या प्रकरणी मृत यश बल्लाळ याचे वडील मुकेश चंद्रकांत बल्लाळ यांनी दादर सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी डंपर चालक गौतम लक्ष्मण महतो (मूळ रा.बोकारो, झारखंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अवैध ओव्हरलोडेड गौण खनिज वाहतूक पेण उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संबंधित महसूल अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.