अलिबाग | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद जवळपास संपुष्टात आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीचे युवा नेते अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत आज (सोमवारी, १ जून) ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यासाठी ते रविवारीच रात्री रत्नागिरीकडे रवाना झाले. कोकणच्या या जागेवरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु होती. जास्त सदस्य संख्या असल्यामुळे उमेदवारी शिवसेनेला मिळावी, अशी मागणी शिवसेना आमदारांची आहे. यासंदर्भात कोकणातील आमदारांनी रविवारी (३१ मे) पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मात्र येथे या आमदारांच्या हाती फारसे काही लागले नाही. महायुतीचे सरकार आहे. युतीच्या निर्णयानुसार रायगडची जागा राष्ट्रवादीसाठी सुटली आहे. त्यामुळे काम करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी-जुवेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवाराचे काम करावे लागेल, असे बजावले आहे.
त्यामुळे आ.महेंद्र दळवी यांना याबाबत विचारले असता, त्यांनी ४ जूनपर्यंत वाट पहा, अशी प्रतिक्रीया दिली आहे. विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेली असली तरी गेली दीड वर्षे रखडलेले रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे. तसेच सव्वा वर्षानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही शिवसेनेकडेच जाणार असल्यामुळे एक पाऊल मागे घेण्याचा सल्ला पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना आमदारांना दिल्याचे समजते. दरम्यान, विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनिकेत तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार, शिंदे गटाचे नेते उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली. यावेळी आगामी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले. विकासाच्या ध्येयाने कार्य करण्यासाठी साहेबांचे मार्गदर्शन प्रेरणादायी राहिले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला पात्र ठरत जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहीन. - अनिकेत तटकरे, उमेदवार, महायुती