शिवसेनेच्या आमदारांनी युतीधर्म पाळावा; एकनाथ शिंदेंच्या सूचना

By Raigad Times    01-Jun-2026
Total Views |
mumbai
 
मुंबई | कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर आता शिवसेना आमदारांनी युतीधर्म पाळावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि नेत्यांना दिल्या. कोकणच्या जागेवरुन एकनाथ शिंदे यांनी कोकणच्या आमदार आणि पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती.
 
एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर आता राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निलेश राणे, विकास गोगावले आणि मंत्री भरत गोगावले हे उपस्थित होते. कोकणची जागा आता राष्ट्रवादीला गेली असल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी आणि पदाधिकार्‍यांनी युती धर्म पाळावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महायुतीत विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.
 
अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असताना महायुतीने त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. एकूण १७ जागांमध्ये भाजप ११ जागा लढवणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेना ४ जागांवर लढणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. विधान परिषदेच्या १७ जागांपैकी किमान सात जागा या आपल्याला मिळाव्यात, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी त्यासाठी चांगलाच जोरही लावला होता.
 
जागावाटपाच्या या चर्चा दिल्लीपर्यंतही गेल्या. मात्र, शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या ४ जागा आल्या आहेत. राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, आता अंतिम जागावाटपानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि कोकण या दोन जागा आल्या आहेत. केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतरच या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, ‘एकनाथ शिंदेंच्या निर्णयापुढे आम्ही जाणार नाही’, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली. तर ‘एकनाथ शिंदे दिलखुलास नेतृत्व’ असे म्हणत सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले.