विकास की विनाशाचे धगधगते सिमेंटकरण ?

By Raigad Times    01-Jun-2026
Total Views |
LEKH
 
उमाजी म. केळुसकर | मानवी संस्कृतीचा इतिहास हा प्रगतीचा इतिहास मानला जातो, मात्र या प्रगतीने आपल्याला निसर्गापासून किती दूर नेले आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. एकेकाळी आपली घरांची रचना माती, वीट आणि दगडांची असायची.
 
त्यावर कौलांचे छप्पर असायचे. ही घरे केवळ निवारा नव्हती, तर ती निसर्गाशी नाते सांगणारी होती. मातीच्या भिंती उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात ऊब द्यायच्या. कौलांच्या फटीतून खेळती राहणारी हवा आणि अंगणातली पारिजातकाची किंवा कडुनिंबाची सावली, हे समीकरणच मानवी आरोग्यासाठी पूरक होते. मात्र, काळाच्या ओघात आपण स्मार्ट होण्याच्या नादात आपल्या राहणीमानाचा पोत पूर्णपणे बदलून टाकला आहे.
 
आज घरांची जागा सिमेंटच्या टोलेजंग इमारतींनी घेतली आहे, मातीच्या वाटा डांबरी झाल्या आणि आता ते डांबरही जाऊन त्या जागी सिमेंटचे काँक्रीट आणि पेवर ब्लॉक्स पसरले आहेत. प्रगतीच्या या धगधगत्या प्रवासात आपण वृक्षराई बोडकी केली आणि पर्यायाने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. शहरांचे वाढते सिमेंटकरण हे आधुनिकतेचे लक्षण मानले जात असले, तरी ते प्रत्यक्षात अर्बन हीट आयलंड (शहरी उष्णता बेटे) तयार करत आहे. पूर्वीची मातीची घरे उष्णता शोषून घेण्याऐवजी ती परावर्तित करायची किंवा मातीचा गुणधर्म असल्याने ती भिंतीमध्ये साठवून ठेवून रात्री संथपणे बाहेर सोडायची, ज्यामुळे घरांतला थंडावा टिकून राहायचा.
 
आताच्या सिमेंटच्या इमारती मात्र दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती उष्णता वातावरणात सोडतात. यामुळे रात्रीच्या वेळीही शहरांमधील तापमान कमी होत नाही. काँक्रीटची ही जंगले उभी करताना आपण हे विसरलो की, सिमेंटला श्वास घेता येत नाही. आज या सिमेंटच्या आंधळ्या शर्यतीने गावेही विळख्यात घेतली आहेत. आश्चर्याची आणि खेदाची बाब म्हणजे, गावांमध्ये घरांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असूनही लोक शहरांचे अनुकरण करत मोठमोठ्या सिमेंटच्या इमारती उभ्या करत आहेत. जिथे प्रशस्त अंगण आणि अखंड सहवास मिळणे सहज शक्य आहे, तिथे अशा मॅचबॉक्स सारख्या इमारती बांधणार्‍यांच्या बुद्धीची खरंच कीव करावीशी वाटते.
 
ज्या निसर्गाच्या कुशीत राहण्याचे भाग्य लाभले आहे, त्या निसर्गालाच सिमेंटच्या खाली गाडून आपण कसला विकास साधत आहोत? विस्तीर्ण भूखंड हाताशी असताना केवळ प्रतिष्ठेसाठी किंवा आधुनिक दिसण्यासाठी स्वतःला सिमेंटच्या भिंतींत कोंडून घेणे, ही एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरीच आहे. ही बुद्धीची मंदी उद्याच्या पिढीसाठी उष्णतेचा नरक उभा करत आहे.या प्रगतीच्या रेट्यात रस्तेही बदलले आहेत. आज ठिकठिकाणी सिमेंटचे रस्ते चकाकताना दिसत आहेत, पण डांबरी रस्ते हेच खर्‍या अर्थाने पर्यावरणपूरक आणि मानवी आरोग्यासाठी कमी त्रासदायक होते. डांबरी रस्त्यांचा पृष्ठभाग हा सिमेंटच्या तुलनेत मऊ असतो, ज्यामुळे वाहनांच्या टायरची होणारी झीज कमी होते. डांबरी रस्ते खराब झाले तरी त्यांची दुरुस्ती सहज शक्य असते, मात्र सिमेंट आणि पेवर ब्लॉक्सचे जाळे एकदा विणले गेले की ते निसर्गासाठी कायमस्वरूपी डोकेदुखी ठरते.
 
सिमेंटचे रस्ते उन्हाळ्यात तव्यासारखे तापतात आणि त्यावरून परावर्तित होणारी उष्णता वातावरणात आगीचे लोळ पसरवते. सिमेंटच्या रस्त्यांसोबतच गल्लीबोळ असो वा मुख्य रस्ते, पेवर ब्लॉक्स बसवण्याचे फॅड आले आहे, जे अत्यंत घातक आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून पेवर ब्लॉक्स हे जमिनीसाठी एखाद्या प्लास्टिकच्या आवरणासारखे काम करतात. जरी त्यांच्या फटीतून पाणी जावे अशी अपेक्षा असली, तरी प्रत्यक्षात खाली असलेल्या सिमेंटच्या थरामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. माणसांसाठी हे रस्ते चालण्यास अत्यंत त्रासदायक आहेत; त्यांच्या असमान पृष्ठभागामुळे पाय घसरणे आणि गुडघेदुखीचे प्रमाण वाढले आहे.
 
वाहनांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, पेवर ब्लॉक्सवर चालणार्‍या गाड्यांचे सस्पेन्शन लवकर खराब होते आणि अपघातांचा धोका वाढतो. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे या नव्या इमारतींच्या बांधकामासाठी आपण केलेली अतोनात वृक्षतोड. वृक्षराई ही शहरांची आणि गावांची फुफ्फुसे असतात. झाडे केवळ सावली देत नाहीत, तर ती वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवतात. इमारतींच्या सोयीसाठी आपण हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या वृक्षांवर कुर्‍हाड चालवली. आज आपली शहरे आणि गावेही बोडकी झाली आहेत.
 
झाडे नसल्यामुळे ढगांना गारवा मिळत नाही आणि पर्यायाने पाऊस लहरी झाला आहे. वृक्षांच्या अभावामुळे हवेतील आर्द्रता संपली असून कोरडी उष्णता वाढत आहे. आपण एसी लावून घराचा थंडावा राखण्याचा प्रयत्न करतो, पण हेच यंत्र घराबाहेरच्या वातावरणात प्रचंड उष्णता सोडून तापमान वाढीला खतपाणी घालत आहे. माती आणि कौलांच्या घरांकडून सिमेंटच्या इमारतींकडे झालेला हा प्रवास भौतिकदृष्ट्या सुखकर वाटत असला, तरी पर्यावरणीयदृष्ट्या तो आत्मघातकी ठरत आहे. डांबरी रस्ते गायब होऊन सिमेंटचे रस्ते आणि पेवर ब्लॉक्स येणे हे प्रगतीचे लक्षण नसून विनाशाचे पाऊल आहे.
 
वृक्षराई तोडून उभ्या राहिलेल्या इमारती आपल्याला निवारा देतील, पण त्या सुख आणि आरोग्य देऊ शकणार नाहीत. जर आपल्याला पुढच्या पिढीला सुरक्षित भविष्य द्यायचे असेल, तर आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाकडे वळावे लागेल. सिमेंटच्या जंगलात किमान काही झाडे आणि मातीचा स्पर्श जिवंत ठेवणे, ही आता गरज नसून काळाची अनिवार्यता बनली आहे. निसर्गाचा सन्मान केला तरच निसर्ग आपले रक्षण करेल, हे विसरून चालणार नाही.