नवी मुंबई | नवी मुंबई गुन्हे शाखेने नेरुळ परिसरातील ‘द ब्लेसफुल स्टे’ या लॉजवर मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली असून, या कारवाईत चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
संबंधित लॉजमध्ये काही तरुणींना गैरकायद्याच्या पद्धतीने ठेवून त्यांच्याकडून अवैध प्रकारे काम करून घेतले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान चार तरुणींची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात या टोळीमार्फत ग्राहकांना तरुणी पुरविण्याचे काम केले जात असल्याचे समोर आले आहे.
तसेच प्रत्येक व्यवहारासाठी सुमारे २० हजार रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपींच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.