पनवेलमध्ये ठाकरे सेनेत मोठे फेरबदल;दिपक निकम नवे जिल्हाप्रमुख,अ‍ॅड.समाधान काशीद महानगरप्रमुख

By Raigad Times    09-May-2026
Total Views |
 panvel
 
पनवेल | सार्वत्रिक निवडणुकांनंतर आगामी काळात पनवेल परिसरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ शिवसैनिक दीपक निकम यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी तर नव्या दमाचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले अ‍ॅड. समाधान काशीद यांची नवे पनवेल महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
रामदास पाटील आणि भरत पाटील यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अधिक मजबुतीने उभी असल्याचे चित्र पनवेल महानगरपालिका निवडणुकीनंतर स्पष्ट झाले होते. मशाल चिन्हावर पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले होते. त्याचबरोबर अनेक प्रभागांमध्ये इतर उमेदवारांनाही चार ते पाच हजारांच्या दरम्यान मतदान मिळाले होते.
 
त्यामुळे विभक्त झाल्यानंतरही पनवेलमध्ये मशाल चिन्हाला चांगले भविष्य असल्याचा संदेश मातोश्रीपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून अधिक मेहनत घेण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतल्याची चर्चा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अनंत गीते, माजी आमदार बाळ माने, उपनेते बबन पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण यांनी पनवेलकडे विशेष लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या निश्चित करण्यात आल्याचे समजते.
 
शुक्रवारी (८ मे) पक्षाकडून या नव्या पदाधिकार्‍यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. १९८० पासून शिवसेनेत सक्रिय असलेले दीपक निकम यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथून शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर नवी मुंबई आणि रायगड परिसरात गणेश नाईक यांच्या समवेत काम करत त्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले. विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी संघर्ष तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा, यामुळे त्यांची ओळख तळागाळातील नेतृत्व म्हणून निर्माण झाली.
 
आदेश बांदेकर यांच्याकडे संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी असताना दीपक निकम यांच्यावर पनवेल विधानसभा संघटकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या पदावर कार्यरत असताना त्यांनी संघटनात्मक पातळीवर मोठे काम उभे केले. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्यभरात राजकीय उलथापालथ झाली असतानाही निकम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका कायम ठेवली.
 
त्यांच्या या निष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवून प्रामाणिकपणाची पावती दिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, नव्या नियुक्त्यांमुळे आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये उद्धव ठाकरे गटाची संघटना अधिक आक्रमक आणि सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीनंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.