शासनाकडून प्रति गुंठा सव्वा दोन लाखांची कपात; शेतकरी संतप्त

विरार-अलिबाग मार्गिकेसाठी भूसंपादन

By Raigad Times    09-May-2026
Total Views |
panvel
 
पनवेल | विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पनवेल तालुक्यातील मोरबे गावातील भूसंपादन दरात प्रति गुंठा तब्बल २ लाख २० हजार रुपयांची कपात करण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकाच जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यकाळात दोन वेगवेगळे दर कसे निश्चित करण्यात आले, असा सवालही शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.
 
पनवेल तालुक्यातील ४१ गावांमधून प्रस्तावित असलेल्या या मार्गिकेमध्ये सहापदरी रस्ता आणि मध्यभागी मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. एप्रिल २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार हेक्टरी सुमारे २ कोटी ७१ लाख रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार काही धनादेशही तयार करण्यात आले होते; मात्र निधीअभावी ते वितरित करण्यात आले नाहीत.
 
त्यानंतर २७ एप्रिल रोजी नव्याने काढण्यात आलेल्या अधिसूचनेत प्रति गुंठा ८ लाख ७७ हजार रुपयांचा दर जाहीर करण्यात आला असून हा दर पूर्वीपेक्षा तब्बल २ लाख २० हजार रुपयांनी कमी आहे. या प्रकल्पातील सुमारे २० टक्के शेतकर्‍यांना जुन्या दरानुसार सुमारे १६६८ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
 
मात्र उर्वरित शेतकर्‍यांना नव्या कमी दराने जमीन द्यावी लागणार आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार यांनी दिलेल्या नोटीशीनुसार २६ जूनपर्यंत नव्या दरास संमती न दिल्यास २५ टक्के वाढीव मोबदल्याशिवाय निवाडा घोषित करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने कमी दर स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवला नसल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे.