अलिबाग । फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (8 मे) जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्याचा 95.03 टक्के निकाल लागला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही यंदा मुलींनी बाजी मारत उत्तीर्णतेत आघाडी कायम राखली आहे रायगड जिल्ह्यातून यंदा दहावी परीक्षेसाठी 35 हजार 475 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.
त्यापैकी 35 हजार 217 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले. यामधील 33 हजार 469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल 95.03 टक्के लागला आहे. यामध्ये 16 हजार 510 मुली तर 16 हजार 959 मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण यंदाही मुलांच्या तुलनेत अधिक राहिले. जिल्ह्यात मुलींचा निकाल 96.44 टक्के तर मुलांचा निकाल 93.70 टक्के इतका लागला आहे.
त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत मुलींनी पुन्हा एकदा आपली सरशी सिद्ध केली आहे. तालुकानिहाय निकालामध्ये पोलादपूर तालुक्याने 97.62 टक्के निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तळा तालुक्याचा निकाल 86.29 टक्के लागला असून तो जिल्ह्यात सर्वात कमी राहिला आहे. निकाल जाहीर होताच यशस्वी विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये व घरांमध्ये आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.