कर्जत | कर्जत तालुक्यातील पेज नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तेथे बुडून मृत्यू झाला. नदीमधील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२९ मे) सायंकाळी घडली.
तालुक्यातील वारे येथील रहिवासी असलेला अजय भास्कर म्हसे (वय ३३) व त्याचा पुणे येथील मित्र सुनिल प्रजापती (वय ३५) हे दोघे अंजप परिसरातील पेज नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास दोघेही नदीत उतरले, मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा योग्य अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
नदी पात्रात मोठ्या प्रयत्नानंतर दोघांना नदीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रायगड रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त करणारी असून तालुक्यातील तरुणाला नदीमधील पाण्याचा अंदाज न आल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.