पनवेल | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडींमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघात संख्याबळ, स्थानिक राजकारण, गटबाजी असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारांची नावे पुढे आल्याने महाविकास आघाडीत काहीसा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने शुक्रवारी (२९ मे) जागावाटपाची घोषणा करत कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोपवला. त्यानंतर पक्षाकडून माजी आमदार बाळ माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बाळ माने हे कोकणातील अनुभवी आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या माने यांनी तब्बल चाळीस वर्षे भारतीय जनता पक्षात कार्य केले आहे. संघटन कौशल्य, स्थानिक संपर्क आणि कार्यकर्त्यांवरील मजबूत पकड यामुळे त्यांचे नाव कोकणातील प्रमुख नेत्यांमध्ये घेतले जाते. २०२४ मध्ये त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. दुसरीकडे, शेतकरी कामगार पक्षाने विधान परिषदेच्या या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, अलिबागच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा या तिघांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. शेकापकडे सुमारे ४२ मतदार असल्याचे सांगितले जात असून, या मतांच्या बळावर निवडणुकीत प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, पनवेल महानगरपालिका निवडणुकी तील राजकीय अनुभव लक्षात घेऊन कोणताही दगाफटका होऊ नये, उमेदवारांवर दबाव टाकून माघार घ्यायला भाग पाडले जाऊ नये आणि शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ होऊ नये, यासाठी तिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली.