अलिबाग | महायुतीत विधान परिषद कोकणची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. अनिकेत तटकरेंना आमदार करण्यासाठी त्यांचे खासदार पिता सुनील तटकरे यांनी ताकद पणाला लावलेली असतानाच,शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे.
जुईली यांचा अर्ज कायम राहिला तर अनिकेत तटकरेंची वाट खडतर होणार आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडलेल्या जाणार्या विधान परिषदेच्या जागेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. खासदार सुनील तटकरे हे त्यांचे सुपूत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी शिवसेनाही आग्रही आहे. त्यामुळे या जागेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
शिवसेनेत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले इच्छुक आहेत. तर माजी आमदार राजन साळवी यांना देखील ही निवडणूक लढण्याची इच्छा आहे. यात आता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईल दळवी यांचीही एंट्री झाली आहे. शुक्रवारी (२९ मे) त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे शिवेसेना शिंदे गटातून एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक लढण्यास तयार असल्याचे दिसत आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ७२३ पैकी सर्वाधिक २७५ जागा शिवसेनेकडे आहेत. त्या खालोखाल भाजपकडे २४१ आणि तिसर्या क्रमांकावर राष्ट्रवादीकडे १४९ सदस्य संख्या राष्ट्रवादीकडे आहेत.
कमी सदस्य असतानाही राष्ट्रवादीला विधान परिषदेची जागा सोडण्यास शिवसेनेचा खासकरुन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा विरोध आहे. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला आणि विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला या अटीवर मंत्री भरत गोगावले जागा सोडण्यास तयार असल्याची चर्चा आहे. मात्र पालकमंत्रीपद शिवसेनेलाच पाहिजे, यासाठी विधानपरिषदेच्या जागेची तडजोड करु नये, असा आग्रह आ.दळवी यांचा आहे. यामुळेच आ.दळवी यांनी कन्या जुईली दळवी-जुईकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे.
राज्यात विधान परिषदेच्या जागावाटपावर महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे कोकणची जागा कुणाकडे जाणार? हे अद्याप निश्चित नाही. ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी खासदार सुनील तटकरे आग्रही आहेत. त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांचे पुनर्वसन या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जागावाटप झाले नसले तरी तटकरे यांनी निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. या अनुषंगाने रविवारी (३० मे) सुतारवाडी येथे महत्वाची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते.
या बैठकीला रायगड जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, प्रतिनिधी, जिल्हा व तालुका प्रवक्ते, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, रायगड जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य नगरपालिका सदस्य सभापती यांना बैठकीला बोलवण्यात आले आहे. या बैठकीमध्ये खा.सुनील तटकरे हे उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर अनिकेत तटकरे आणि राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, विधान परिषदेसाठी रायगडात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू आहे. यात आता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी कन्या जुईली दळवी (जुईकर) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यामुळे सस्पेन्स तयार झाला आहे. अर्थात, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम असल्याचेही आ.दळवी यांनी म्हटले आहे.