अलिबाग | माथेरान-नेरळ-कळंब रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत माथेरान-नेरळ-कळंब रस्त्याच्या सुधारणेची कामे हाती घेण्यात आली आहेत.
प्रकल्पांतर्गत माथेरान ते नेरळ दरम्यानचा घाटमाथ्यावरील रस्ता अरुंद, तीव्र उताराचा व धोकादायक वळणांचा असल्याने बांधकामाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवणे कठीण होणार असल्याचे निदर्शनास आले होते. माथेरानमध्ये प्रवेशासाठी नेरळ-माथेरान घाट रस्ता हा एकमेव मार्ग असून, दस्तुरी नाका येथील पार्किंग क्षमता मर्यादित असल्यामुळे अनेक वाहनचालकांना घाट रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढतो.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी रस्ता दुरुस्तीची कामे करण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशी न करता सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सदर मार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणार्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.