महाड | पालकमंत्रीपदावरुन याआधीच खूप सहन केले आहे, आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुनील तटकरेंची दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी दिला आहे. कोकण मतदारसंघातून शिवसेनेकडून विकास गोगावले हेच उमेदवार असतील, अशी घोषणाच शिवसैनिकांनी यावेळी केली आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विकास गोगावले यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, ही मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेची बैठक जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (२६ मे) घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीविरोधातील खदखद पुन्हा एकदा शिवसैनिकांनी व्यक्त केली. पालकमंत्रीपद, त्यानंतर रायगड जिल्हा परिषद, म्हसळा नगरपंचायत सत्तांतर प्रकरणात शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर मैत्रीपूर्ण लढत देण्याखेरीज आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे घोसाळकर यांनी म्हटले आहे. भरत गोगावले यांच्यावर झालेला अन्याय शिवसैनिकांनी खपवून घेतला.
मात्र तसाच अन्याय विकास गोगावले यांच्यावर होत असेल, तर खपवून घेणार नाही, कोकण मतदारसंघात शिवसेनेचे मतदार सर्वाधिक आहेत. काही अन्य पक्षांचे मतदारही आमच्या बरोबर येण्यास तयार आहेत. त्यामुळे विकास गोगावले निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रायगडचा पालकमंत्री ही आमचाच असेल आणि विधानपरिषदेचा उमेदवारही आमचाच असेल.
अधिकृत उमेदवारी मिळो न मिळो विकास गोगावले हेच या मतदारसंघाचे उमेदवार असतील. त्यासाठी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल, पण त्यांना निवडून आणूच, असा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी तटकरे यांच्यावर धुर्त आणि स्वार्थी अशा शब्दांत टिका केली. यावेळी जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, महिला आघाडी जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर, विजय सावंत, महाडच्या सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडीक, तालुकाप्रमुख रवींद्र तरडे, शहरप्रमुख डॉ.चेतन सुर्वे, यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.