दुहेरी हत्याकांडाने खालापूर हादरले;वृद्ध दाम्पत्याची गळा चिरुन निर्घृण हत्या

By Raigad Times    27-May-2026
Total Views |
khopoli
 
खोपोली | खालापूर तालुक्यातील निगडोली गावात ७५ वर्षीय वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२६ मे) उघडकीस आली. या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ दत्तू फराट (वय ७५) आणि त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फराट (वय ७२) हे निगडोली गावात एकटे राहत होते. रघुनाथ फराट हे बँकेतून सेवानिवृत्त झाले होते. मंगळवारी दिवसभर फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा नातू आदित्य फराट हा घरी आला. मुख्य दरवाजा उघडत नसल्याने त्याने घराच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. घरात शिरताच आजी-आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.
 
रघुनाथ फराट यांचा गळा चिरलेला होता, तर सुरेखा फराट यांच्या चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले. तसेच दोघांच्या अंगावर राख आणि पाला-पाचोळा टाकण्यात आल्याचेही दिसून आले. हा प्रकार पाहताच आदित्यने आरडाओरडा केला. त्यानंतर गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
 
khopoli
 
फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या दुहेरी हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही घटना नेमकी कधी घडली, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. वयोवृद्ध दाम्पत्याची एवढ्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने निगडोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.