मुरुड | मुरुड आगारातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुरुड-बोरीवली रातराणी एसटी बसचे धावत्या अवस्थेत मागील डाव्या बाजूचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना रविवारी (२४ मे) घडली. सुदैवाने पाठीमागून येणार्या एका सतर्क मोटारसायकलस्वाराने तात्काळ चालकाला याची माहिती दिल्याने मोठा अपघात टळला आणि बसमधील सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचले.
मुरुड आगारातून २२ मे रोजी मुरुड-बोरीवली आणि बोरीवली-मुरुड अशी रातराणी बससेवा सुरु करण्यात आली आहे. रविवारी (२४ मे) रात्री सुमारे साडेदहा वाजता मुरूडहून बोरीवलीकडे निघालेली एसटी बस कुरुळजवळ पोहोचताच मागील डाव्या चाकाचे सर्व आठ नट निघून गेले आणि चाक वेगळे झाले. त्याचवेळी मागून येणार्यामोटारसायकलस्वाराच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ बसचा पाठलाग करुन चालकाला धोका असल्याची सूचना दिली.
चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि संभाव्य दुर्घटना टळली. दरम्यान, बसमधील प्रवासी जितेंद्र मुंबईकर यांनी सांगितले की, "मी या बसमधून प्रवास करत होतो. कुरुळच्या अलीकडे एका मोटारसायकलस्वाराने चालकाला गाडीचे चाक निखळल्याची माहिती दिली. त्यानंतर चालकाने तातडीने बस थांबवली. त्या मोटारसायकलस्वारामुळे आम्हा सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. तो आमच्यासाठी देवदूतच ठरला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्यांचे नाव समजू शकले नाही.