रोहा येथे उत्पादन शुल्क विभागाच्या जप्त वाहनांचे अज्ञाताकडून नुकसान

By Raigad Times    26-May-2026
Total Views |
roha
 
रोहा | रोहे शहरातील उत्पादन शुल्क विभागाने विविध दारुबंदी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली चारचाकी वाहने अज्ञात व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायकर पार्क येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयालगत उभी केली होती.
 
मात्र, सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने ही वाहने रस्त्याच्या विरुद्ध बाजूस ढकलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भविष्यात न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित वाहनमालकांना वाहने परत देण्याची वेळ आल्यास नुकसान भरपाईची जबाबदारी कोणाची? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
 
दरम्यान, "वाहने कोणी आणि कोणत्या कारणासाठी हटविली, याचा शोध घेण्यात येत आहे. चौकशीनंतर संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल”, असे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अपर्णा पोकळे यांनी म्हटले आहे.