आंबेनळी घाटात भीषण अपघात! स्कॉर्पिओ १२०० फूट दरीत कोसळली;सातार्‍यातील आठ तरुणांचा मृत्यू

दापोलीहून परतताना अपघात , ड्रोनच्या मदतीने वाहनाचा शोध

By Raigad Times    26-May-2026
Total Views |
poladpur
 
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी ७ तरुण सातारा जिल्ह्यातील असून एक चिपळूण रत्नागिरीचा आहे. हे सर्वजण दापोली येथे पर्यटनासाठी गेले होते.
 
परतीच्या प्रवासादरम्यान त्यांची स्कॉर्पिओ आंबेनळी घाटातील दाभिळटोंक परिसरात सुमारे १२०० ते १५०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेनंतर सातार्‍यातील तीन गावांवर शोककळा पसरली आहे.सातारा जिल्ह्यातील हे आठ तरुण दापोलीतील करदे समुद्रकिनार्‍यावर पर्यटनासाठी गेले होते. रविवारी (२४ मे) रात्री ते आपल्या गावाकडे परतत असताना हा अपघात घडला. गाडीतील कोणाशीही मोबाईलवर संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी शोधमोहीम सुरु केली आणि सातारा पोलिसांशी संपर्क साधला.
 
तपासादरम्यान संबंधित तरुणांचे शेवटचे लोकेशन आंबेनळी घाटातील दाभिळटोंक येथे आढळून आले. घटनास्थळी दिशादर्शक ‘क्रॅश बॅरिअर’ तुटलेले तसेच रस्त्यावर टायरच्या खुणा दिसून आल्याने याच ठिकाणी अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, तहसीलदार कपिल घोरपडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
 
मात्र, रात्रीच्या अंधारात खोल दरीत उतरणे धोकादायक असल्याने बचावकार्य पुढे ढकलण्यात आले. सोमवारी (२५ मे) सकाळी महामार्ग वाहतूक पोलीस, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सी-स्केप महाडच्या बचाव पथकांनी दोरखंडांच्या सहाय्याने दरीत उतरुन शोधमोहीम सुरु केली. प्रशासनाने ड्रोन कॅमेर्‍याच्या मदतीने दरीत पडलेल्या स्कॉर्पिओचा शोध लावला.
 
दरीत शोधकार्य सुरु असताना गाडी ज्या-ज्या ठिकाणी आदळली होती, त्या-त्या ठिकाणी मृतदेह आढळून आले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. रेस्क्यू टीमचे प्रमुख सागर दहिर्वेकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे मार्गदर्शन केले. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर पहिला मृतदेह दरीबाहेर काढण्यात पथकाला यश आले. अखेर सर्व आठ मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
 
प्राथमिक अंदाजानुसार, स्कॉर्पिओ चालकाला या अपघातप्रवण घाटमार्गाची पुरेशी माहिती नसल्याने तीव्र वळणाचा अंदाज आला नसावा. प्रथम वाहन सूचना फलकाजवळील धक्क्यावर चढले आणि त्यानंतर काही अंतरावरील संरक्षक कठड्याला धडकून खोल दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण रुग्णालयात छावणीचे स्वरुप
अपघातातील मृतदेह पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ नये, यासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालय परिसरात छावणीसदृश व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी दुपारपर्यंत सर्व बचाव पथकांचे सदस्य, पोलादपूर पोलीस, प्रशासन आणि रुग्णवाहिका कर्मचार्‍यांनी संयुक्तपणे कार्य करून आठही मृतदेह दरीतून बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.
दाभिळटोंक ठरतेय मृत्यूचे टकमक टोक
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील दाभिळटोंक अनेकदा मृत्यूचे टकमक टोक ठरले असल्याचे आजपर्यंतच्या अपघाताच्या घटनांमुळे अधोरेखित झाले आहे. पहिल्यांदा दाभिळटोंक येथे झी-टिव्हीचे संचालक झैदी यांची कार कोसळून झालेल्या अपघातात संपूर्ण झैदी कुटूंब ठार झाले होते.
 
यानंतर दाभिळटोंक येथे डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळून एक व्यक्ती वगळता संपूर्ण बसमधील ३० प्रवासी कर्मचारी ठार झाले होते आणि आता सातार्‍यातील तरुणांच्या स्कॉर्पिओला हा अपघात झाला.
या तीन गावांवर शोककळा
या दुर्घटनेमुळे"आसगाव, मर्डे आणि खटाव या तिन्ही गावांवर शोककळा पसरली असून संपूर्ण सातारा जिल्हा या दुर्घटनेने हळहळला आहे."
दुर्घटनेतील मृत तरुणांची नावे
संदीप अशोक काटकर (३५, खटाव, सातारा),अंश समीर चव्हाण (१८, बोरगाव, चिपळूण),महेश अनिल पवार (२५, आसगाव, सातारा),आदित्य अशोक साळुंखे (२१, आसगाव),रितेश राजेंद्र लोखंडे (२५, आसगाव),सुहास जितेंद्र लोखंडे (२०, आसगाव)
उत्कर्ष आनंदा शिंगटे (२१, मर्डे),निखिल अभिमन्यू शिंगटे (२५, मर्डे)