नेरळ | नेरळमध्ये हिंदूंनी एकजुटीची ताकद दाखविण्याची गरज असल्याचे सांगत, हिंदू समाजाने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केले. यावेळी त्यांनी हिंदू संघटन,धर्मांतर, अतिक्रमण आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली.
नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात विराट हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनात नितेश राणे बोलत होते. आपल्या भाषणात राणे यांनी नेरळ परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. भविष्यात लोकसंख्यात्मक आणि सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर नेरळच्या ओळखीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
तसेच हिंदू समाजाच्या प्रश्नांवर सरकार ठामपणे उभे असल्याचा दावा करत, हिंदूंवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हिंदू समाजाने स्वाभिमानाने जगावे, धर्मांतरासारख्या प्रवृत्तींना बळी पडू नये आणि समाजातील ऐक्य टिकवून ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. राणे यांनी संविधानातील समानतेचा मुद्दा उपस्थित करत विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
हिंदू सण-उत्सवांवरील निर्बंध, लव्ह जिहादविरोधी कायदा, धार्मिक शिक्षण संस्था आणि स्थानिक पातळीवरील सामाजिक तणाव यांसंदर्भात त्यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. हिंदू समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि हितरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांना हिंदू म्हणून एकत्र राहण्याचे आणि सामाजिक प्रश्नांवर सजग राहण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण सहकार्यवाह अॅड.अविनाश मोरे, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.वर्षा जोशी तसेच समितीचे अध्यक्ष कुमार जाधव यांनीही मार्गदर्शन केले. अॅड.अमोल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ.वर्षा जोशी यांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, एकत्र कुटुंब व्यवस्था आणि नागरी कर्तव्ये यांसारख्या पाच सूत्रांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.