नवी मुंबई | वाशी हायवे ब्रिजवर धावत्या खासगी लक्झरी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. पुण्याहून गुजरातमधील राजकोटकडे प्रवाशांना घेऊन जाणारी मनीष ट्रॅव्हल्सची बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळेत खाली उतरविण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस वाशी हायवे ब्रिजवरून प्रवास करत असताना चालकाच्या निदर्शनास इंजिनमधून धूर निघत असल्याचे आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्याच्या सूचना दिल्या. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने अचानक रौद्ररूप धारण केले आणि काही क्षणांत संपूर्ण बसला वेढा घातला.
चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाशी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले असून ती पूर्णतः जळून खाक झाली आहे. या आगीमुळे वाशी हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आग आटोक्यात आल्यानंतर आणि जळालेली बस हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून इंजिन अतिउष्ण होणे किंवा शॉर्ट सर्किट हे संभाव्य कारण असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.