डॉ.मनीष पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती...महेंद्र घरत यांचा काँग्रेसला रामराम?

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमुळे चर्चेला उधाण

By Raigad Times    25-May-2026
Total Views |
uran
 
उरण | काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ.मनीष पाटील यांच्या नियुक्तीनंतर, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
 
डॉ.मनीष पाटील यांची दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी स्वतः डॉ. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. मात्र, त्यानंतर अचानक घरत यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्याने रायगड काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घरत यांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे विचारणा करण्यात आली.
 
याबाबत बोलण्यास अनेक नेत्यांनी टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन कळविण्यात येईल असे सांगितले, परंतु सायंकाळपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नव्हती. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या कठीण काळात संघटनेची धुरा सांभाळणारे नेतृत्व म्हणून महेंद्र घरत यांच्याकडे पाहिले जात होते.
 
त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विविध आंदोलनांपासून संघटनात्मक उपक्रमांपर्यंत अनेक कामे केली होती. त्यामुळे त्यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चेमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, महेंद्र घरत यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले असले तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र त्यांचा राजीनाम्याचे वृत्त रायगडात चर्चेचा विषय ठरला.