रायगड काँग्रेसला नवे नेतृत्व , उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी डॉ.मनिष पाटील यांची नियुक्ती

By Raigad Times    22-May-2026
Total Views |
 uran
 
उरण | उत्तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आक्रमकपणे काम करणारे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्व म्हणून डॉ. पाटील यांच्याकडे पाहिले जात असल्याने त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.निवडीनंतर डॉ. मनीष पाटील यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानत, रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले.
 
कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासोबतच युवक, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत काँग्रेस संघटना कमकुवत झाल्याची चर्चा सुरू असताना नव्या नेतृत्वामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता डॉ. मनीष पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीची घोषणा होताच जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी विश्वास व्यक्त केला आहे.