एअरपोर्ट ट्रेनिंग, जॉब गॅरंटी, प्लेसमेंटचे आमिष...नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त तरुणांची फसवणूक?

उरणमधून ‘बोल्ड विंग’ संस्थेविरोधात तक्रार; आ.रोहित पवारांनी केली चौकशीची मागणी

By Raigad Times    22-May-2026
Total Views |
uran
 
उरण | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे रोजगाराच्या आशेवर असलेल्या स्थानिक व प्रकल्पग्रस्त युवकांची नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. "एअरपोर्ट ट्रेनिंग”, "जॉब गॅरंटी” आणि "प्लेसमेंट”चे आमिष दाखवत लाखो रुपये उकळल्याचा आरोप ‘बोल्ड विंग’ या खासगी प्रशिक्षण संस्थेवर करण्यात आला आहे.
 
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ.रोहित पवार यांनी ‘बोल्ड विंग’ संस्थेसह पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातील इतर संबंधित संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
 
उरण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना विमानतळावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत प्रशिक्षणाच्या नावाखाली हजारो ते लाखो रुपये आकारले जात असल्याचा आरोप आहे. मात्र, पैसे भरल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने युवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्याकडे स्थानिक युवक जय मधुकर पाटील यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.
 
तक्रारीनुसार, विमानतळावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत ‘बोल्ड विंग’ संस्थेने त्यांच्याकडून ८८ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे भरल्यानंतरही कोणतीही नोकरी उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्त युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "जमिनी आमच्या गेल्या, रोजगाराचे आश्वासन सरकारने दिले आणि आता नोकरीच्या नावाखाली आमचीच लूट सुरू झाली,” अशी भावना युवक व्यक्त करत आहेत.
 
आ.रोहित पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये स्थानिक व प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळणे हा त्यांचा कायदेशीर आणि नैतिक हक्क आहे. मात्र, काही खासगी संस्था आणि दलाल बेरोजगारांच्या भावनांशी खेळत असल्याचे चित्र समोर येत आहे. "जॉब गॅरंटी”, "एअरपोर्ट ट्रेनिंग” आणि "प्लेसमेंट”च्या नावाखाली ‘बोल्ड विंग’ प्रशिक्षण संस्थेकडून स्थानिक युवकांकडून ५० हजार ते १ लाख रुपये प्रशिक्षण शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आहे.
 
मात्र, त्यानंतर कोणतीही नोकरी उपलब्ध करून दिली जात नसल्याने अनेक युवकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या अनुषंगाने संबंधित संस्थांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ.रोहित पवार यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदनही त्यांनी विजय सिंघल यांना दिले असून, या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन सिडको प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.